पैसे परत मागितल्यावर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली धमकी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्यापेक्षा लहान असलेल्यांशी मैत्रीचे संबंध ठेवून फार्म हाऊससाठी लोणावळ्यात जागा विकत घेऊन देतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगली कमाई करुन देतो, असे सांगून एका सुखवस्तू नागरिकाची १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या नागरिकाने पैसे परत मागितल्यावर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत कर्वेनगर येथील एका ५६ वर्षाच्या नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निशुन राधेशाम पटेल (वय ३९), मधुबाला राधेशाम पटेल (दोघे रा. गुरुदत्त अॅव्हेन्यू, कोरेगाव पार्क) आणि विवेकआनंद देवन शेनॉय (वय ६९, रा. पॉप्युलर हाईटस बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्कमधील गुरुदत्त अॅव्हेन्यमध्ये मार्च २०२३ ते १८ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपींनी फिर्यादी यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवले. त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांना फार्म हाऊससाठी लोणावळा येथे जागा विकत देतो, असे सांगितले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवून देतो, असे आश्वासन दिले.
फिर्यादी व त्यांची पत्नी यांच्याकडून वेळोवेळी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, लोणावळा येथील जागा विकत दिलेली नाही. पैसेही परत दिले नाहीत. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याकरीता दिलेले पैसे देखील परत दिलेले नाही.
फिर्यादी यांची गाडी स्वत:च्या वापराकरीता घेऊन ती परत न करता फसवणुक केली. फिर्यादी यांनी पैशांची व जागेची मागणी केली असता त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो, अशी धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव तपास करीत आहेत.
