शाळेत नृत्यशिक्षकांने केला होता मुलांवर लैंगिक अत्याचार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे.
अन्वित सुधीर फाटक (वय ४०) याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. शाळेमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या शारीरीक, मानसिक किंवा लैंगिक शोषणासाठी शाळेमधील मुलांची सुरक्षा, सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लैंगिक व्हिडिओ दाखवून लहान मुलांवर अत्याचार केले. मुलावर अत्याचार करतानाचे त्याचे मोबाईलमध्ये रेकॉडिंग करुन ती इतर लोकांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच मुलाला शपथ देऊन मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर पासून १४ डिसेंबर पर्यंत सुरु होता.
दरम्यान, या शाळेमध्ये समुपदेशादरम्यान आणखी काही लहान मुलांवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतही तपास करावा, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट देऊन केली.
या प्रकारात शाळा प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संस्थाचालक अन्वित पाठक व ट्रस्टी तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
शाळेत मुलांचे गुड टच, बॅड टच चे समुपदेशन होत नाही़ पालक व शिक्षकांच्या बैठका वेळेवर होत नाही.
शिक्षकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले जात नाही. संस्थेचे प्रशासन याबाबत गांभियार्ने पहात नाही. त्यामुळे या घटना घडत असल्याचे पालकांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणले. याबाबत शिक्षण आयुक्त व पोलीस अधिकार्यांशी बोलून त्यावर ठोस कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
