आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग

Spread the love

दिल्ली : अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सरहद पुणे आयोजित ९८वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली.

या पाहणीसाठी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, प्रदीप पाटील, अतुल बोकरिया, लेशपाल जवळगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार यांनी संमेलनस्थळावरील उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

तालकटोरा स्टेडियममध्ये किती लोक येऊ शकतात, त्यांच्या बसण्याची, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी होईल याची पाहणी त्यांनी केली. संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद या संमेलनासाठी अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह देशभरातील नामवंत साहित्यिक, कवी, लेखक या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहतील. साहित्यप्रेमीही मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज आहे. त्या अनुषंगाने सुव्यवस्थित नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर उपाययोजना कराव्यात, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

संमेलनाच्या तीन दिवसांत साहित्यिक परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखती असे विविध कार्यक्रम होणार आहेत. पुस्तक विक्रीसाठीही भव्य दालन असणार आहे. या तयारीचीही माहिती पवार यांनी घेतली.
‘महाराष्ट्र ही सलोख्याची आणि समन्वयाची भूमी आहे. ही ओळख निर्माण होण्यात मराठी वाङ्मयाचा मोठा वाटा आहे.

भारताचे वैचारिक प्रतिनिधित्व करण्यात महाराष्ट्राचा आणि मराठी साहित्याचा मोठा वाटा आहे. यशवंतराव चव्हाण यांसारख्या नेत्यांनी साहित्यात आणि देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

देशाच्या राजधानीत संमेलन होत असताना महाराष्ट्राच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करून मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठावर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत,’ असे पवार यांनी यावेळी सांगितले.

संमेलनाचे सुसज्ज आयोजन व व्यवस्थापनासाठी कुशल टीम, तांत्रिक सुविधा आणि उपस्थित साहित्यरसिकांच्या दृष्टीने हे संमेलन स्मरणीय कसे होईल, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. हे संमेलन मराठी साहित्याचा अनोखा सोहळा ठरणार असून त्यातून मराठी साहित्य आणि सांस्कृतिक बंध अधिक विस्तारतील, असे सरहदचे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले.