आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सासुने सुनेचा चावा घेऊन केले जखमी

Spread the love

पुणे : आंघोळीला मला जायचे आहे, असे सांगितल्यानंतरही मुलाला आंघोळीसाठी बाथरुममध्ये पाठविल्याने चिडलेल्या सासुने सुनेच्या दंडावर, हातावर पायाच्या मांडीला जोरात चावा घेऊन जखमी केले.

याबाबत ३७ वर्षाच्या सुनेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ६० वर्षाच्या सासुविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धनकवडीतील काशीनाथ पाटील नगर येथे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोठ्या मुलाला शाळेत जायचे असल्याने त्यांनी मुलाला उठवून आंघोळीला जाण्यास सांगितले होते. त्यावर सासु म्हणाली मला जायचे आहे. तेव्हा फिर्यादी म्हणाल्या की, मुलाला शाळेत जायचे आहे, म्हणून त्यांनी मुलाला बाथरुममध्ये पाठवले.

त्याचा सासुला राग आला. त्यांनी शिवीगाळ करत सुनेला हाताने मारहाण करायला सुरुवात केली. मारता मारता सुनेच्या डाव्या हाताच्या दंडाला, हाताच्या अंगठ्याला, पायाच्या मांडीला जोरात चावा घेऊन जखमी केले. फिर्यादी या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना अनेक लोकांशी बोलावे लागते.

त्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी फियार्दीचा संबंध जोडून त्यांची सासु फिर्यादीवर संशय घेऊन वारंवार मारहाण करत असते. सासुच्या या त्रासामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली आहे.