आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चुहा गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई

Spread the love

पुणे : तडीपार असतानाही शहरात प्रवेश करून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चुहा गँगवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. जामा मस्जीदजवळ, संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय २९, रा. धानोरी) आणि कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तौसिफ जमीर सय्यद याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असतानाही तो २३ नोव्हेंबरच्या रात्री आपल्या साथीदारांसह अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी कात्रज येथे आला होता. आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार धनाजी पोपट धोत्रे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा घालून चौघांना अटक केली.

तपासादरम्यान त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, १५ ग्रॅम मॅफेड्रॉन, कोयता, डिजिटल वजन काटा, सुतळी, स्क्रू ड्रायव्हर आणि दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून येरवडा तुरुंगात आहेत.

टोळीप्रमुख तौसिफ ऊर्फ चुहा याने वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेऊन संघटित टोळी तयार केली होती. आर्थिक फायद्यासाठी आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळीने अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत.

कोंढवा, कात्रज, संतोषनगर, मार्केटयार्ड आणि पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करून युवकांना व्यसनाधीन बनवण्याचे काम ही टोळी करत होती. काही वेळा त्यांना गुन्हेगारी टोळीत सामील करून गुन्हे करण्यास प्रवृत्त केले जात होते.

आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या माध्यमातून अपर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील यांना या प्रकरणाचा अहवाल सादर केला होता. तपासाअंती या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहायक फौजदार चंद्रकांत माने, शैलेंद्र साठे, पोलीस हवालदार ढमढेरे, मासाळ, जमदाडे, सावंत, धोत्रे, भोसले, जगदाळे आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे हवालदार विशाल वारुळे, पोलीस अंमलदार स्वप्नील बांदल यांनी सहभाग घेतला.