टोळक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, लोणी काळभोरमधील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून पोल्ट्री फॉर्ममध्ये शिरुन टोळक्याने व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत विजय श्रीरंग काळभोर (वय ४६, रा. रायवाडी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोन्या ऊर्फ निखील घायाळ (रा. लोणी स्टेशन, कदमवाक वस्ती) व त्याच्या ३ ते ४ साथीदारांवर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना लोणी काळभोर मधील वडाळे वस्तीत सोमवारी दुपारी चार वाजता घडली. सोन्या ऊर्फ निखील घायाळ याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी त्याला यापूर्वी तडीपारही केले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय काळभोर आणि निखील घायाळ यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन घायाळ याने फिर्यादी व त्यांचा भाऊ दीपक काळभोर हे शेतात असताना मोबाईलवर कॉल करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी हे शेतातील पोल्ट्री फॉर्मवर आले. तेव्हा मोटारसायकलवरुन सोन्या घायाळ व त्याचे तीन ते चार साथीदार आले. त्यांनी विजय काळभोर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांच्यातील एकाने लोखंडी रॉडने त्यांच्या दोन्ही हातावर मारुन जखमी केले. इतरांनी तेथे पडलेले दगड फेकून मारल्याने त्यांच्या दोन्ही पायाला मार लागला़.
आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून सोन्या घायाळचा हिसका बघीतला का? बघतोच एक एकाला असे म्हणाल्याने पोल्ट्री फॉर्मवरील कामगार घाबरुन लपून बसले. विजय काळभोर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.
