आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अमित शहा यांच्या विधानाविरोधात भूममध्ये बंद, भीमसैनिकांचे आंदोलन

Spread the love

भूम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी भूम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत निदर्शने केली आणि जाहीर निषेध नोंदवला.

परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस प्रशासनाविरोधातही निषेध नोंदवण्यात आला. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये देऊन पुनर्वसन करण्याची तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

भीमनगर येथील बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा शेंडगे गल्ली, गांधी चौक, नगर परिषद मार्गे जाऊन गोलाई चौकात पोहोचला.

मोर्चादरम्यान अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढण्यात आली. व्यापारी वर्गाने बंदला पाठिंबा देत पूर्ण सहकार्य केले. गोलाई चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. अमित शहा यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात प्रविण रणबागुल, चंद्रमणी गायकवाड, रोहित गायकवाड, महेंद्र गायकवाड, बाळासाहेब सुकाळे, विकी जावळे, सचिन शिंदे, कदू जानराव, सायरन गायकवाड, राहुल शिंदे, अक्की गायकवाड, वैभव गायकवाड, अक्षय गायकवाड, विशाल शिंदे, रोहित जानराव, मुकुंद लगाडे, प्रकाश सीतापे, अमित थोरात, अज्जू वाघमारे, आकाश कोरडे, किरण शिंदे काँग्रेस उपाध्यक्ष विलास शाळू, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, सिराज मोगल, फेरोज शेख लहुजी शक्ती सेनेच्या अश्विनी साठे, रिपब्लिकन सेनेच्या रेश्मा शेख, लहुजी सेना तालुका ध्यक्ष दत्ता साठे तसेच भीमसैनिक व माहिला उपस्थित होते शेकडो भिमसैनिक सहभागी झाले होते.