येरवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आर्थिक फसवणुकीमुळे आलेल्या मानसिक तणावातून आत्महत्या करण्यास गेलेल्या एका ४३ वर्षीय इंजिनिअरला येरवडा पोलिसांनी शोधून त्याचे समुपदेशन करून त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.
संगमवाडी येथे राहणारा हा इंजिनिअर एका नामांकित टेक्नॉलॉजी कंपनीत कार्यरत आहे. त्याने अभिषेक बिराजदार याच्याकडे लोकांकडून पैसे घेऊन गुंतवणूक केली होती. या व्यवहारातून पावणे अकरा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्याला ३५ लाख रुपये परत मिळणे अपेक्षित होते.
मात्र, अभिषेक बिराजदारने फसवणूक करून पैसे परत न दिल्यामुळे हा इंजिनिअर मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला. फसवणुकीच्या तणावातून या इंजिनिअरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात सुसाईड नोट लिहून तो घराबाहेर निघून गेला.
पत्नीने येरवडा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. इंजिनिअरचा मोबाईल बंद असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत होते. शेवटचे लोकेशन होळकर पुलाजवळ आढळून आले. मात्र, पोलिसांना तो तेथे सापडला नाही.
मध्यरात्री १२:२२ वाजता त्याचा मोबाईल सुरू झाल्याचे आढळले. नवीन लोकेशन खडकी येथील चर्चच्या जवळील मोकळ्या मैदानात असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अंधाऱ्या मैदानात विमनस्क अवस्थेत बसलेल्या त्या व्यक्तीला शोधून काढले. त्याला समुपदेशन करून आत्महत्येचा विचार सोडायला लावला आणि नंतर त्याला सुरक्षितपणे कुटुंबाच्या स्वाधीन केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, फौजदार शिंदे, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड आणि तांत्रिक विभागाचे पोलीस हवालदार किरण घुटे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. येरवडा पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद असून, त्यांनी तणावग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचवून समाजाला सकारात्मक संदेश दिला आहे.
