आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन अल्पवयीन मुलांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस

Spread the love

पुणे : तळजाई वसाहतीमध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या रेकॉर्डवरील दोन अल्पवयीन गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी पकडले असून, त्यांच्या कडून ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

तळजाई वसाहतीतील बळवंत तांबे गल्लीतील एका घराचा दरवाजा उघडून, कपाट तोडून त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले होते. ही घटना १० डिसेंबर रोजी घडली होती.

सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तळजाई वसाहतीतील रेकॉर्डवरील एक बाल गुन्हेगार हा सध्या एका रिक्षामध्ये बसला आहे आणि त्याच्याकडे चोरीचे दागिने आहेत.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि पालकांच्या समक्ष चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलीक, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, खंडू शिंदे, योगेश ढोले आणि महेश भगत यांच्या पथकाने केली.