आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

वारजे माळवाडी येथील या घटनेत राजू महादेव मारणे (वय २४, रा. दत्तनगर, रामनगर वसाहत, वारजे माळवाडी) गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्याचे वडील महादेव विनायक मारणे (वय ५९, रा. दत्तनगर, रामनगर वसाहत, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी यश गोपीनाथ साष्टे (वय २१, रा. दत्तनगर, रामनगर वसाहत, वारजे माळवाडी) व त्याच्या ६ ते ७ साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजता दत्तनगर येथील गोगावले यांच्या मोकळ्या पडिक प्लॉटच्या गच्चीवर घडली.

राजू मारणे व यश साष्टे हे जवळजवळ राहतात. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून यश व त्याच्या साथीदारांनी राजूवर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय, यश व त्याच्या एका साथीदाराने धमकी देत, “आमच्या नादाला लागायचे नाही, नाहीतर एकेकाला खल्लास करून टाकतो,” असे म्हणत दहशत निर्माण केली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड करीत आहेत.