आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस अधिकार्‍याला लाच देणार्‍या इस्टेट एजंटला अटक

Spread the love

पुणे : गुन्हा दाखल होऊ नये, गुन्ह्यात कारवाई टाळावी किंवा दाखल गुन्ह्यात मदत मिळावी, अशा अनेक कारणांमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना पकडले जातात. मात्र, यावेळी पोलीस अधिकाऱ्याला लाच देणाऱ्या एका इस्टेट एजंटला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच अशी कारवाई आहे.

लाच देताना पकडलेल्याचे नाव हसनअली गुलाब बारटक्के (वय ४५, रा. सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रोड) आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

आरोपी हसनअली बारटक्के याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१४, ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास नंदकुमार कदम यांच्याकडे आहे. कदम यांनी या गुन्ह्यात मदत करावी, म्हणून हसनअली बारटक्के वारंवार लाच देण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, कदम यांनी लाच स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांनी बारटक्के विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली आणि ताडीवाला रोड पोलीस चौकीत नंदकुमार कदम यांना दोन हजार रुपयांची लाच देताना बारटक्के याला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने काम केले.