१५ हजार गावांत मिळकत पत्रिका तयार, घराच्या मालकीची सनद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रत्येक गावातील मिळकतींना आता शहरांप्रमाणे (प्रॉपर्टी कार्ड) मिळकत पत्रिका मिळणार आहे. पुणे विभागातील चार हजार गावांमधील मिळकतींची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली आहे.
या गावांतील ६ लाख २५ हजार ९७२ मिळकतींना मिळकत पत्रिका दिली जाणार आहे. राज्यातील एकूण ३० हजार ६१४ गावांमध्ये नव्या मिळकत पत्रिका देण्यात येणार आहेत. मिळकतीचे नकाशे काढण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे, आणि आतापर्यंत १४ हजार गावांमध्ये हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
भूमि अभिलेख विभागाचे पुणे प्रदेशाचे उपसंचालक अनिल माने यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत राज्यातील भूमि अभिलेख विभागाकडून गावांमध्ये मिळकत पत्रिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मिळकत पत्रिकेसाठी सुरुवातीला ड्रोनद्वारे संबंधित मिळकतीचे छायाचित्र घेतले जाते. त्यानंतर भूमि अभिलेख विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी जाऊन हद्दीची तपासणी करतात. यावेळी ग्रामसेवकांची मदत घेतली जाते. तसेच शेजारील हद्दींबाबतही तपासणी व पडताळणी करून रजिस्टरमध्ये नोंद केली जाते.
आतापर्यंत १४ हजार ९५२ गावांमध्ये मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये २३ लाख २२ हजार ३३ पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. ड्रोनद्वारे मोजणी ९९ टक्के पूर्ण झाली आहे. फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत गावांचे ड्रोनचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीचे काम ८४ टक्के पूर्ण होईल.
मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे प्रत्येक घराच्या मालकीची सनद उपलब्ध होऊन मिळकतीचे संरक्षण केले जात आहे.
