महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वडिलांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावावर असलेल्या जमीन व मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठी बाणेर सज्जा कार्यालयातील तलाठ्यास दहा हजार रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तलाठ्यासह एकाला अटक करण्यात आली आहे.
उमेश विठ्ठल देवघडे (वय ३९, बाणेर सज्जा कार्यालय, वर्ग-३) आणि काळुराम ज्ञानदेव मारणे (वय ३९, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदाराच्या वडिलांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्याकडील जमीन व मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तलाठी कार्यालयात सादर केला होता.
त्याचा पाठपुरावा तक्रारदार करत होते. तक्रारदार अर्जाच्या चौकशीसाठी बाणेर तलाठी कार्यालयात गेले असता, तलाठी उमेश देवघडे यांनी वारस नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १० हजार रुपयांवर सहमती झाली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तलाठी उमेश देवघडे यांच्या सांगण्यावरून काळुराम मारणे याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. त्यामुळे दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यावेळी तलाठी देवघडे यांच्या गाडीतून ३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक नीता मिसाळ करत आहेत.
