आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कर्ज मंजुर करुन देण्याच्या आमिषाने ११ लाखांना गंडा

Spread the love

पुणे : कर्ज मंजुर करुन देतो, असे सांगून कर्ज प्रक्रियेसाठी कागदपत्रे व वेगवेगळी कारणे सांगून एका व्यावसायिकाची तब्बल १० लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत खडकी येथील एका ४३ वर्षाच्या व्यावसायिकाने खडकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्यवसासासाठी कर्ज हवे होते.

त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर पाहणी केली. त्यात इक्विटस स्मॉल फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, असे एकाने त्यांना सांगितले. कर्ज प्रक्रियेसाठी त्यांच्याकडून ईमेलवर कागदपत्रे मागवून घेऊन त्यांच्या विश्वास संपादन केला.

त्यानंतर सिक्युरिटी रक्कम भरावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून पैसे मागावून घेतले. इन्श्युरन्स, कमिशन, जीएसटी रक्कम भरावयाची आहे, असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे मागावून घेतले.

त्यानंतर पहिल्या वर्षाचे अ‍ॅडव्हॉन्समध्ये व्याज जमा करावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून आणखी पैसे उकळले. इतके पैसे दिल्यानंतरही कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आता त्यांनी तक्रार दिली असून पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करीत आहेत.