सहकारनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बिकानेर चौकातून यामाहा मोटारसायकलवरून भरधाव जाणाऱ्या दोघांना पकडून सहकारनगर पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांची ८ चोरीची वाहने जप्त केली आहेत.
अन्वर सलीम शेख (वय २१, रा. नुर मोहम्मद मस्जिद गल्ली, दाते बसस्टॉप, सहकारनगर) आणि फरीद लालापाशा सय्यद (वय १९, रा. नुर मोहम्मद मस्जिद गल्ली, सहकारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सहकारनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पेट्रोलिंग करत असताना, एका यामाहा मोटारसायकलवरून बिकानेर चौकातून भरधाव जाणारे दोन व्यक्ती दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर थांबवले.
त्यांच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी के. के. मार्केट भागातून यामाहा मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले आणि ती विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे सांगितले. पुढील चौकशीत त्यांनी आणखी सात वाहने चोरल्याची कबुली दिली.
या दोघांकडून २ लाख ४० हजार रुपयांची एकूण ८ चोरीची वाहने जप्त करण्यात आली. सहकारनगर पोलीस स्टेशनकडील वाहन चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे आणि सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, विनायक एडके, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, खंडू शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, अभिमान बागलाने, बबलू भिसे, सचिन येनपुरे, आणि नामदेव केंद्रे यांनी केली आहे.
