आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचीच पतंग कटण्याची वेळ

Spread the love

पुणे : नायलॉन किंवा चिनी मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हा मांजा जखमी करणाऱ्या आणि जीवघेण्या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहे. दुचाकीस्वारांच्या गळ्यावर मांजा अडकल्याने अपघातांची संख्या वाढत असून, पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. नागरिकांनी या जीवघेण्या मांजाचा वापर थांबवावा, अशी मागणी केली जात आहे.

राज्य सरकारने २०१७ मध्ये नायलॉन, चिनी आणि प्लास्टिक मांजावर बंदी घातली. परंतु, या बंदीचे उल्लंघन करून छुप्या पद्धतीने या मांजाची विक्री सुरू आहे. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे जीव धोक्यात येत आहेत. तसेच, या मांजामुळे गटारे आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह तुंबत आहेत.

संक्रांतीच्या काळात पतंग उडविण्याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र, साध्या दोऱ्याऐवजी नायलॉन मांजाचा वापर केल्याने अपघात होत आहेत. शहरात दररोज अशा १० घटना घडत असून, महिनाभरात १०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

रेस्क्यू टीमच्या सदस्य सायली पिलाने म्हणाल्या, “नायलॉन मांजाचा वापर थांबवला, तरच अपघात कमी होतील.” “मी रामटेकडी पुलावरून जात असताना समोर अचानक मांजा आला आणि माझा गळा चिरला गेला. थोडक्यात मी वाचलो, पण डॉक्टरांनी सांगितले की, गहिऱ्या जखमेने जीवावर बेतले असते,” असे दुचाकीस्वार भैरव भाटी यांनी सांगितले.

नायलॉन मांजा विघटनशील नसल्याने जमिनीत मिसळून पर्यावरणासाठी हानीकारक ठरतो. त्याचा गटारे तुंबण्यापासून नद्यांपर्यंत पाण्याच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होत आहे. राज्य सरकारने पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. हा मांजा वापरताना किंवा विक्री करताना आढळल्यास कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल होतो.

हा जामीनपात्र गुन्हा असला, तरी न्यायालयाच्या आदेशानुसार कारावास किंवा दंड होऊ शकतो. भांबुर्डा वन विभागातील अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे एका घुबडाचा जीव वाचवण्यात आला. नीलेश महाजन यांनी झाडावर अडकलेल्या घुबडाला सुखरूप सोडवले. त्यांनीही मुलांनी नायलॉन मांजाचा वापर थांबवावा, असे आवाहन केले.

नायलॉन मांजामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी आणि प्रशासनाने कडक कारवाई करून या जीवघेण्या मांजाच्या विक्रीवर आळा घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे.