अर्धवट दरवाजा उघडा ठेवण्याची खोड नडली
चोरट्याने घरात शिरुन लॅपटॉप, ४ मोबाईल, रोकड केली लंपास
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात आलेले तरुण-तरुणी भाड्याच्या खोलीत राहतात. प्रत्येकाची जाण्या-येण्याची वेळ वेगळी असल्याने अनेकदा दरवाजा फक्त लोटून ठेवला जातो किंवा बाहेर गेलेला कोणी परत दरवाजा लावत नाही. याचाच गैरफायदा घेऊन चोरटे अशा घरात घुसतात आणि हाताला लागणाऱ्या वस्तू लांबवतात.
अशाच प्रकाराची घटना ताडीवाला रोडवरील आकाशगंगा सोसायटीत घडली. चोरट्याने लॅपटॉप, चार मोबाईल आणि रोकड असा एकूण १ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला आहे.
याबाबत अथर्व आनंदराव निकम (वय २४, रा. रहिमतपूर, कोरेगाव, जि. सातारा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मंगळवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी आणि त्यांचे मित्र खोलीत झोपलेले असताना रुमचा अर्धवट उघडा दरवाजा पाहून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्याने लॅपटॉप, चार मोबाईल आणि रोकड असा एकूण १ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. अवघ्या अर्ध्या तासात चोरी झाली. बंडगार्डन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
