मंत्रालय प्रवेशासाठी फेस आयडी आणि क्यूआर कोड प्रणाली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : मंत्रालयातील सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कुणालाही सहजासहजी मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. मंत्रालय सुरक्षा आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “यापुढे मंत्रालयात फेस आयडीद्वारेच प्रवेश मिळेल. ज्या मजल्यावर काम असेल तिथेच परवानगी दिली जाईल. इतर मजल्यांवर जाण्यास परवानगी असणार नाही. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे.
प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याचीही पद्धत लागू करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत ही प्रणाली कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.” सरकारच्या या निर्णयामुळे मंत्रालयातील प्रत्येक व्यक्तीचा डेटा जतन केला जाईल.
कोण किती वेळ मंत्रालयात होता, काय काम केले, काम पूर्ण झाले की नाही, आणि एका कामासाठी किती वेळा चकरा मारल्या, याची नोंद ठेवली जाईल. राज्य सरकारचा हा निर्णय मंत्रालयाची सुरक्षा आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा घडवेल. डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून प्रशासन अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.
