आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गौतम गंभीरचे पद धोक्यात? टीम इंडियाची कामगिरी न सुधारल्यास BCCI करणार कारवाई

Spread the love

पुणे : भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीवर टीका होत असून, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मेलबर्न कसोटीत पराभवानंतर गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना खडसावत, “बस, आता खूप झाले, तुमचा मर्जीचा कारभार थांबवा,” असे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या कामगिरीत सुधारणा न झाल्यास बीसीसीआय गंभीर यांच्यावर कारवाई करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारताने ३-० ने पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पर्थ कसोटीत एकतर्फी विजय मिळवला. मात्र, नंतरच्या सामन्यांमध्ये संघाची कामगिरी पुन्हा घसरली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पिंक बॉल कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला, तर मेलबर्न कसोटीतही भारतीय संघ पराभूत झाला. यानंतर संघाच्या निवडीपासून फलंदाजांच्या कामगिरीपर्यंत अनेक गोष्टींवर टीका होत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजले की, “आणखी एक कसोटी सामना शिल्लक आहे. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर गंभीर यांचे पद धोक्यात येऊ शकते.”

बीसीसीआयच्या माहितीनुसार, गंभीर हे प्रशिक्षकपदी पहिली पसंती नव्हते. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि काही परदेशी प्रशिक्षकांनी तिन्ही फॉरमॅटचे प्रशिक्षक बनण्यास नकार दिल्याने बीसीसीआयला गंभीर यांची नियुक्ती करावी लागली होती.

आता भारतीय संघाचा आगामी सामना आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीवर गौतम गंभीर यांचे भवितव्य अवलंबून आहे.