आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अवघ्या 11 महिन्यात MPDA कारवाईचे शतक

Spread the love

पुणे : सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शहरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडाकेबाज पाऊल उचलले आहे. त्यांनी MPDA (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस एक्टिविटीज) कायद्याअंतर्गत 103 गुन्हेगारांना स्थानबद्ध केले असून, हा विक्रम अवघ्या 11 महिन्यात केला आहे.

अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी 31 जानेवारी 2024 रोजी नियुक्ती झाली. त्यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करत MPDA कायद्याचा प्रभावी वापर केला. पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खंडणी, गंभीर दुखापत, दंगल, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, वाहन तोडफोड, गावठी दारू निर्मिती, व विक्री अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

गुन्हेगारांविरोधातील MPDA कारवाईसाठी विशेष मोक्का एमपीडीए सेल स्थापन करण्यात आला. या सेलने संबंधित गुन्हेगारांची मागील पाच वर्षांची माहिती गोळा करून आवश्यक कागदपत्रांचा पाठपुरावा केला.

ही सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर पोलीस आयुक्त MPDA कायद्यानुसार संबंधित गुन्हेगारांना राज्यातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर आणि नाशिक या विविध कारागृहांत एक वर्षासाठी स्थानबद्ध करतात.

“सराईत आणि अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल,” असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने काम करत आहे.

मोक्का एमपीडीए सेलची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का एमपीडीए सेल आणि सर्व्हेलन्स पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अशा कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत झाली आहे.