आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डॉ. मनमोहन सिंग यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज

Spread the love

पुणे: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे नव्या पिढीसाठी आदर्श मार्गदर्शक असून, त्यांचे विचार आचरणात आणणे ही आजची गरज आहे, असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे डॉ. सिंग यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. चोरडिया म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग हे प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि उत्कृष्ट प्रशासक होते. अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या दूरदृष्टीने भारताला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. १९९१ साली त्यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा देशासाठी क्रांतिकारक ठरल्या. त्यांचे साधे जीवन, प्रामाणिकपणा आणि दृढ विश्वास हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”

सभेला संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. सिंग यांच्या शांत, संयमी व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या देशसेवेच्या दृष्टिकोनाचा गौरव केला. सल्लागार समिती सदस्य ऍड. पांडुरंग थोरवे म्हणाले, “डॉ. सिंग हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार होते.

त्यांनी राबविलेली धोरणे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारी ठरली. त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. “कार्यक्रमाच्या समारोपाला सर्वांनी सुजाण भारतीय नागरिक म्हणून कर्तव्यपालन करण्याची शपथ घेतली. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.