उच्च ध्येय मनाशी बाळगून अथक परिश्रम करा : दामिनी दिवाकर (आयआरएस)
पिंपरी चिंचवड जैन महासंघातर्फे ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात गुणगौरव
महाराष्ट्र जैन वार्ता
आकुर्डी-निगडी : पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे विभागाच्या जीएसटी व कस्टम विभागाच्या सहाय्यक आयुक्त दामिनी दिवाकर (आयआरएस) उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया होते. व्यासपीठावर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सीए डॉ. अशोककुमार पगारिया, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, महामंत्री संदीप फुलफगर, निवर्तमान अध्यक्ष उमेश पाटील तसेच जीएसटी अधीक्षक देवेंद्र बाकलीवाल उपस्थित होते.
या समारंभात ९९ टक्क्यांपासून ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळविलेल्या ११० विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन प्रमुख अतिथी तसेच महासंघ व विविध जैन श्रावक संघांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दामिनी दिवाकर म्हणाल्या, “नेहमी उच्च ध्येय मनाशी बाळगा आणि त्या ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम करा. निश्चितपणे तुम्ही यशस्वी व्हाल.
अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश नक्कीच मिळते, कारण ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’.”
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “इरादा पक्का, हौसला बुलंद और मेहनत करने की तैयारी हो, तो कुछ भी असंभव नहीं है. आपल्या आवडीचे ध्येय निवडा, त्याच्याशी एकरूप व्हा आणि यशस्वी व्हा.”
या कार्यक्रमासाठी महासंघाचे माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, प्रा. प्रकाश कटारिया तसेच विविध श्रीसंघांचे अध्यक्ष दिलीप भन्साळी, नंदकुमार लुणावत, अशोक बागमार, विजय बलदोटा, सुभाष सुराणा, अनिता नहार, लता पगारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहाचे अध्यक्ष सुनील जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महासंघाचे पदाधिकारी श्रेणिक मंडलेचा, विरेश छाजेड, अभिनंदन छाजेड, तुषार मुथा, शुभम कटारिया, रुपेश बागमार, हर्षल लुंकड, सचिन कोगनोळे आणि हितेश सुराणा यांनी विशेष परिश्रम घेतले.
