विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासासाठी “खाऊ गल्ली” उपक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांच्या वतीने आनंद मेळावा अंतर्गत “खाऊ गल्ली” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील व्यावहारिक ज्ञान, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, संघभावना, कल्पकता आणि समायोजन क्षमता यांसारख्या कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या खाऊ गल्लीचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ह. भ. प. योगी निरंजननाथ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त ह. भ. प. अभयजी टिळक, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या खाऊ गल्लीमध्ये स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. शालेय क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपल्या पाककौशल्याने उपस्थितांचे मन जिंकले.
उद्घाटन समारंभानंतर उपस्थित मान्यवरांनी खाऊ गल्लीतील विविध पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या पाककौशल्याचे कौतुक केले. विद्यार्थी आपल्या प्रयत्नांबद्दल मिळालेल्या प्रशंसेने आनंदित झाले.
ही खाऊ गल्ली शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी खुली होती.
सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने खाऊ गल्लीचा आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कल्पकतेला दाद दिली. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास व व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यासाठी सहाय्य केले, असा सर्व उपस्थित मान्यवरांचा एकमुखी अभिप्राय होता.
