आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बनावट कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाची फसवणूक

Spread the love

पुणे : गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या जामीनदाराला वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

संतोषकुमार शंकरराव तेलंग (वय ३२, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या जामीनदाराचे नाव आहे. वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे असलेल्या लष्कर न्यायालयात ही कारवाई शनिवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली.

फिर्यादी पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे यांच्या तक्रारीनुसार, बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड हा तिलकसिंग टाक टोळीचा सक्रिय सदस्य आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगणे, दरोडा, जबरी चोरी आणि वाहन चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच दुकानदार आणि पथारीवाल्यांना धमकावून फुकट वस्तू लुबाडण्याचे प्रकारही त्यांनी वारंवार केले आहेत.

गेल्या वर्षी या टोळीतील १० जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये बच्चनसिंग भोंड याचा समावेश आहे. सध्या तो येरवडा तुरुंगात असून, त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.

बच्चनसिंगला जामीन मिळावा यासाठी संतोष तेलंग याने खोटे नाव धारण केले आणि बनावट रेशनकार्ड, सातबारा उतारा जोडून अर्ज केला. वानवडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून तेलंगला पकडले.त्याच्याकडील मोटारसायकलच्या डिकीतून बनावट आधार कार्ड, रेशनकार्ड आणि अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.