पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा नव्या वर्षात गुन्हेगारांना सज्जड इशारा
महाराष्ट्र न्तुज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी नव्या वर्षात पुन्हा एकदा गुन्हेगार आणि अवैध धंदे करणार्यांना कडक इशारा दिला आहे.
पोलीस आयुक्त म्हणाले की, “ज्यांना मस्ती आली असेल, बेकायदेशीर धंद्यांद्वारे पैसे कमवत असतील, गँग चालवून खंडणी मागत असतील, किंवा बळाच्या जोरावर जमीन आणि घरे खाली करायला लावणाऱ्या संघटित टोळक्यांनी सावध राहावे. अशा कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांत गुंतलेले असाल, तर शहर सोडून निघून जा. सापडला तर सात पिढ्यांना लक्षात राहील अशी कठोर कारवाई करू.”
पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील प्रमुख गुन्हेगारी टोळ्यांच्या गुन्हेगारांना बोलावून थेट इशारा दिला होता. वानवडी येथील मुद्देमाल वितरण कार्यक्रमात त्यांनी याच इशाऱ्याची पुनरावृत्ती केली.
महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताहानिमित्त परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील ९ पोलीस ठाण्यांच्या ८० गुन्ह्यांमधील मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. १ कोटी ७६ लाख ६७ हजार ३०२ रुपयांचा हा मुद्देमाल दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम यांचा समावेश होता.
कार्यक्रमात सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
“गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि गुन्ह्यांचा शोध लावणे ही आमची जबाबदारी आहे. तुम्हाला कोणत्याही अवैध कृत्याची माहिती मिळाल्यास त्वरित ११२ वर फोन करा किंवा पोलीस ठाण्यात कळवा. आम्ही वेळोवेळी कारवाई करू,” असे अमितेशकुमार यांनी सांगितले.
चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्याबद्दल नागरिकांचे समाधान कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी पोलिसांविषयी समाधान व्यक्त केले. काही महिलांना गहिवरून आले. चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळणार नाहीत, असे म्हणणाऱ्यांना पोलिसांनी दिलेल्या सेवेमुळे दिलासा मिळाला, यासाठी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
