गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखा युनिट-१ ने खंडणी मागणाऱ्याला अटक केली आहे. सुरज बागमार यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून ६० ते ७० लाख रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याच्या गांभीर्याचा विचार करत पोलिस उपआयुक्त निखील पिंगळे यांनी आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यानुसार, गुन्हे शाखा युनिट-१ चे प्रभारी अधिकारी शब्बीर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि ठिकठिकाणी शोध घेत अज्ञात आरोपीचा शोध घेतला.
या तपासात आरोपीचे नाव मितीन सरोज असे समोर आले. मितीन सरोज हा रॉयल एंटरप्रायझेस, सोमवार पेठ, पुणे येथील दुकानात काम करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी युनिट-१ चे अधिकारी आणि पथकाच्या मदतीने रॉयल एंटरप्रायझेस दुकानातून मितीन सरोज याला ताब्यात घेतले.
तपास केल्यानंतर त्याने गुन्हा केले असल्याची कबुली दिली. मितीन सरोज, वय ३१, रा. लोहियानगर, गल्ली नं. १, पुणे (मूळ गावी अलाहाबाद, उत्तरप्रदेश) यास पुढील कारवाईसाठी खडक पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार शुभम देसाई, निलेश साबळे आणि विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.
