खिशातील रोकड जबरदस्तीने नेली चोरुन : पुणे स्टेशन येथील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे :अनोळखी व्यक्तीला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने तरुणावर ब्लेडने वार करुन जखमी करुन खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत वडीथा गोविंदा नाईक (वय २८, रा. आण्णाभाऊ साठे वस्ती, अप्पर डेपोच्या मागे, बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ येथे शनिवारी रात्री पावणे अकरा च्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे रेल्वे स्टेशनसमोरील तुकाराम शिंदे वाहनतळाजवळ उभे होते. त्यावेळी एक जण त्यांच्याकडे आला व त्याने पैसे मागितले. नाईक यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने नाईक यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यांच्या खिशातील ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊ लागला. त्याला नाईक यांनी विरोध केला. तेव्हा त्याने खिशातून ब्लेड काढून नाईक यांच्या तोंडावर मारुन त्यांना जखमी करुन ८०० रुपये घेऊन तो पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तपास करीत आहेत.
