रागाने पाहिल्याच्या कारणावरून इंजिनिअर तरुणाचा हात तोडला
बिबवेवाडीतील घटना : VIT कॉलेज परिसरात दहशत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : केवळ “रागाने पाहतो” या कारणावरून एका अल्पवयीन मुलासह दोघांनी कोयत्याने वार करून एका इंजिनिअर तरुणाच्या उजव्या हातावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा हाताचा पंजा तोडला गेला, ही खळबळजनक घटना बिबवेवाडीमध्ये घडली.
पीयूष पाचकुडवे (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. यापूर्वी, मार्च २०२३ मध्ये सुखसागरनगरमध्ये किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला करून एका तरुणाचा पंजा तोडण्यात आला होता. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून तो पंजा पुन्हा जोडला होता. मात्र, या वेळी पीयूष पाचकुडवे यांच्या हाताचा पंजा पुन्हा जोडता आलेला नाही, असे समजते.
या प्रकरणी गौरव राजेश मरकडे (वय २४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सागर सरोज (वय २१, रा. वडकी नाला) याला अटक केली असून, त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना सुपर इंदिरानगर येथील शिवतेज क्रीडा संघ चौकात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव मरकडे आणि त्यांचा मित्र पीयूष पाचकुडवे यांना आरोपींनी चौकात बोलावून घेतले. तिथे पोहोचल्यावर दोघांनी कोयत्याने हल्ला केला. पीयूष यांच्या उजव्या हातावर इतक्या जोरात वार करण्यात आले की हाताचा पंजा तुटून वेगळा झाला.
त्यांच्या डोक्यावर आणि पायावरही वार झाले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. गौरव यांच्यावरही डोक्यावर, खांद्यावर, आणि दंडावर हल्ला करण्यात आला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे करत आहेत.
