आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

केअरटेकर महिलेने २५ तोळे सोन्याचे दागिने लांबविले

Spread the love

पुणे : वृद्ध महिलेची काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकर महिलेनेच २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे

गायत्री सुनिल हातेकर (वय २४, रा. गणपती मंदिराजवळ, चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार २६ जून ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बिबवेवाडीतील विद्यासागर सोसायटीमधील अर्थव बंगला येथे घडला.

अतुल श्रीकांत रावळ (वय ५४, रा. धनकवडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या आई मंगला श्रीकांत रावळ (वय ७१) या एकट्याच अर्थव बंगला येथे राहतात. त्यांच्या कपाटातील लॉकरमधून २५.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरले गेल्याचे आढळले.

पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गायत्री हातेकर यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत, केअरटेकर म्हणून काम करत असताना, सप्टेंबर २०२४ मध्ये तिने कपाटातून दागिने चोरल्याची कबुली दिली.

चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी १४६ ग्रॅम वजनाचे, ८ लाख ७० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ, पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, राहुल शेलार, नितीन कातुर्डे आणि हवालदार गोकुळा काटकर यांनी केली आहे.