भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज येथील राजेंद्र ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या टोळक्यावर पोलिसांनी छापा घालून तीन जणांना अटक केली होती. मात्र, यावेळी तीन आरोपी पळून गेले होते. तब्बल दीड महिन्यानंतर सापडलेल्या आरोपीकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
यश दीपक घोडके (वय १८, रा. सच्चाई माता मंदिराजवळ, आंबेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कात्रज येथील राजेंद्र ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्यासाठी टोळके जमल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकून यश बोरकर, प्रसाद कांबळे आणि आर्यन काळे यांना अटक केली होती, तर यश घोडके आणि त्याचे दोन साथीदार पळून गेले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते.तांत्रिक विश्लेषणावरून पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, महेश बारवकर, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना आरोपी बालाजीनगर येथील शंकर महाराज वसाहतीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी सापळा रचून यश घोडके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने दोन घरफोड्यांची कबुली दिली.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, महेश बारवकर, सागर बोरगे, अभिनय चौधरी, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे आणि सचिन सरपाले यांच्या पथकाने पार पाडली.
