आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

येरवड्यात तरुणीवर कोयत्याने वार करुन खुन

Spread the love

पुणे : येरवडा परिसरातील रामवाडी येथील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये पैशांच्या वादातून तरुणीवर कोयत्याने वार करुन तिचा निर्घुण खुन करण्यात आला आहे.

शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. ही घटना रामवाडी येथील डब्ल्यु एन एस या बहुराष्ट्रीय आय टी कंपनीत मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा कोदारे ही तरुणी मुळची कराड येथे राहणारी आहे. ती रामवाडी येथील डब्ल्यु एन एस या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाऊंट विभागात कामाला होती. याच कंपनीत कृष्णा कनोजा काम करत आहे. पैशांवरुन त्यांच्यात वाद झाला होता.

कंपनी सुटल्यानंतर ती कंपनीच्या पार्किंगमध्ये आली. त्याचवेळी कनोजा याने तिला गाठले. तिच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केला. हा वार इतका जोरात होता की त्यात तिचा हातच तुटला. जखमी तरुणीवर तातडीने येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला. येरवडा पोलिसांनी कृष्णा कनोजा याला अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत.