महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील के.एल.ई. सोसायटी बेळगाव संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये 1994 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सोलापूर, पुणे, धाराशिव, लातूर, हैदराबाद, अहमदनगर, बार्शी शहर आणि तालुक्यातून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत एकत्र आले. यावेळी शाळेतील माजी मुख्याध्यापक आणि शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे प्रवेशद्वार व कार्यक्रम हॉल रांगोळी व फुग्यांनी आकर्षकपणे सजवण्यात आले होते. तब्बल 30 वर्षांनंतर 80 मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना भेटले. त्यांच्या गळाभेटी आणि गुरुजनांना पदस्पर्श करून घेतलेले आशीर्वाद हा क्षण प्रत्येकाला भावनिक करणारा होता.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी सर्वांचे स्वागत करून के.एल.ई. संस्था व शाळेची झालेली प्रगती याविषयी माहिती दिली. माजी मुख्याध्यापक एस.एम. गणाचार्य, माजी सहशिक्षक एस.डी. जमाले, व्ही.बी. शेटे, आणि माजी उपमुख्याध्यापिका व्ही.पी. उगाणे यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
स्नेहमेळाव्यात गुरुजनांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपली यशोगाथा आणि शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेने दिलेले संस्कार आणि ज्ञानरूपी शिदोरीमुळे जीवनात यशस्वी झाल्याचे अनेकांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन खुडे, मनीष रुगले, किरण श्रीश्रीमाळ, स्वाती जगताप, लक्ष्मी तोरड, धनंजय घोलप, हेमंत जाधव, दीपक जुगदार, बिडवे, अनंत मस्के, प्रविण घोटाळे या माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुरस्कार निधी म्हणून 21,000 रुपये कायमठेवीसाठी मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वर्षा रसाळ यांच्या पसायदानाने झाली.
