नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हे संपर्काचे प्रभावी साधन बनले आहे. प्रत्येक सामान्य नागरिकाकडे मोबाईलचा सहज वापर होत असून, पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे नागरिक तक्रारी किंवा मदतीसाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असतात. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे अनेक वेळा नागरिकांना संपर्क साधण्यात अडचणी येतात. कारण संबंधित अधिकारी त्यांच्या सोबत जुने मोबाईल क्रमांक घेऊन जातात.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून एक अभिनव योजना राबवण्यात आली आहे. या अंतर्गत, पोलीस अधीक्षकांपासून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसाठी शासकीय मोबाईल खरेदी करण्यात आले आहेत.
यामध्ये विशिष्ट क्रमांकाचे सिमकार्ड दिले गेले आहे. त्यामुळे, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बदलले तरी संबंधित पोलीस स्टेशनचा मोबाईल क्रमांक तोच राहणार आहे. या उपक्रमामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक सुलभ होईल तसेच पोलीस कामकाज अधिक कार्यक्षम होईल.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवाहन: सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांच्या अडीअडचणींविषयी मदतीसाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या खालील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा. यामुळे नागरिकांना तातडीने मदत मिळेल आणि पोलीस यंत्रणेबद्दलचा विश्वास अधिक दृढ होईल.
