आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रिंगरोडचे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन पूर्ण, भूमिपूजन लवकरच

Spread the love

पुणे : रिंगरोड प्रकल्पाच्या पश्चिम भागासाठी ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन पूर्ण झाले आहे. भूमिपूजनासाठी मुहूर्त ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ९) आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत भूमिपूजनाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डुडी यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील पायाभूत प्रकल्पांमध्ये रिंगरोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम भागातील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे, त्यामुळे काम लवकरच सुरू करता येईल. प्रकल्पाच्या सुरुवातीसाठी ९० टक्के भूसंपादन आवश्यक असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्व भागात मात्र भूसंपादनाचे काम ८२ टक्क्यांपर्यंत झाले असून उर्वरित १८ टक्के भूसंपादन बाकी आहे. त्यामुळे कामाची सुरुवात पश्चिम भागातून करण्यावर भर दिला जाईल. पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत भूसंपादनाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यात आली आहे.

भूसंपादन प्रक्रिया सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून २०२९ पर्यंत विमानतळ तयार करण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने (एमएडीसी) यापूर्वीच अधिसूचना काढली होती, मात्र सरकारने आता भूसंपादनासाठी अधिकृत निर्देश जारी केले आहेत.

डुडी यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणाली १०० टक्के कार्यान्वित करण्यात आली आहे, तर पुणे जिल्ह्यात सध्या ६० टक्के कामकाज ई-ऑफिसद्वारे चालते. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार आणि प्रांत कार्यालये यांना संपूर्णतः ऑनलाइन प्रक्रियेद्वारे कार्यरत करण्याचे उद्दिष्ट आहे.

यामुळे सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांत अनावश्यक हेलपाटे मारावे लागणार नाहीत, आणि प्रत्येक अर्जावर ठरलेल्या वेळेत कार्यवाही केली जाईल. रिंगरोड प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मुहूर्त गुरुवारच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूक समस्यांवर तोडगा निघण्यास मदत होईल.