चार गुन्हे उघडकीस; साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या वर्षभरात हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या युगुलांना शस्त्राचा धाक दाखवून आणि प्रसंगी मारहाण करून लुटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार गुन्हे उघडकीस आले असून, साडेतीन लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी दिली.
स्वप्नील शिवाजी डोंबे (वय ३२, रा. जनता वसाहत) आणि अनिकेत अनिल स्वामी (वय २५, मूळ रा. जनता वसाहत, सध्या रा. किरकटवाडी, सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त गिल यांनी सांगितले की, हे आरोपी हनुमान टेकडीवर गेलेल्या युगुलांना शस्त्राचा धाक दाखवून लुटायचे.
दोन दिवसांपूर्वी भर दुपारी एका तरुणीच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी लुटण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना डेक्कन पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली. पहिल्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, दुसऱ्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले, तर तिसऱ्या पथकाने बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एका गाडीचा नंबर शोधला.
या तपासातून आरोपींना पकडण्यात आले. स्वप्नील डोंबे आणि अनिकेत स्वामी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाणे आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.या कारवाईदरम्यान धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या मॉन्टी ऊर्फ तेजस खराडे (वय २३, रा. जनता वसाहत) याला देखील अटक करण्यात आली आहे.
मॉन्टी हाही सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिंहगड रोड, दत्तवाडी आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, पोलीस हवालदार धनश्री सुपेकर, महेश शिरसाट, गभाले, पोलीस अंमलदार सागर घाडगे, वसीम सिद्धीकी, रोहित पाथरुट आणि धनाजी माळी यांनी केली.
