खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षाहून अधिक काळ होता फरार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून एक वर्षाहून अधिक काळ फरार असलेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने पकडले आहे.
मोन्या ऊर्फ प्रज्योत बाळकृष्ण उमाळे (वय २३, रा. राजीव गांधीनगर, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २०२३ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मोन्या उमाळे आणि त्याच्या साथीदारांवर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती, त्यानंतर तो फरार झाला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पोलीस अंमलदार जहांगीर पठाण व विशाल इथापे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, उमाळे खडकी बाजारमधील गाडी अड्ड्यावर थांबला असल्याचे समजले. माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग यांच्या ताब्यात उमाळे याला सोपवण्यात आले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार प्रविण भालचीम, एकनाथ जोशी, विठ्ठल वाव्हळ, नागेश सिंगकुंवर, जहांगीर पठाण, विशाल ईथापे, देवीदास वाढंरे, राहुल परदेशी, सुभाष आव्हाड, रोहिणी पंढारकर, मयुरी नलावडे आणि सहायक फौजदार शितल शिंदे यांचा सहभाग होता.
