आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ठेकेदार विठ्ठल पोळेकर हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद

Spread the love

पुणे : डोणजे येथील शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करणारा सराईत गुन्हेगार योगेश भामे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. विविध ठिकाणी पावणे दोन महिन्यांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत असलेला भामे सातारा-पुणे रोडवर सापळा लावून जेरबंद करण्यात आला.

विठ्ठल पोळेकर (वय ७०, रा. डोणजे) हे १४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता फिरायला गेले असता त्यांचे अपहरण करण्यात आले होते. खडकवासला धरणात मृतदेहाचे तुकडे फेकून दिल्याची कबुली मिळाली. पायगुडेवाडी-गोळेवाडी रस्त्याच्या ठेक्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून भामेने खंडणीसाठी एक जेग्वार कार मागितली होती. ती न दिल्याने त्यांचा खून करण्यात आला.

पोळेकर यांच्या अपहरणात वापरलेली कार भामेच्या ताब्यात असल्याचे समजताच तोच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आधीच शुभम सोनवणे आणि मिलिंद थोरात यांना जबलपूर येथून अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी योगेश भामे फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके त्याच्या शोधात तैनात होती.

योगेश भामे कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याचा पाठलाग केला. त्याचवेळी तो पुण्याकडे येत असल्याचे कळाल्याने सातारा-पुणे रोडवर सारोळा पुलाजवळ सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. योगेश भामे याच्याविरुद्ध खुनासह एकूण ९ गुन्ह्यांची नोंद असून त्यात अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे गुन्हे समाविष्ट आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी केली.