सरकारचा मोठा निर्णय : इंग्रजी शाळांवर होणार कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. यासंदर्भात नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी भाषा पर्यायी केल्याचीही चर्चा होती. मात्र, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आता मराठी भाषा शिकवणं सर्व शाळांसाठी अनिवार्य केलं असल्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. यामध्ये केंद्रीय मंडळाच्या (CBSE) तसेच अन्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही हा नियम लागू असेल. “इंग्रजी शाळांना आता कोणतीही पळवाट काढता येणार नाही.
मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असून, त्या शाळांमधील शिक्षकांनाही मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे,” असे भुसे यांनी स्पष्ट केले.दादा भुसे पुढे म्हणाले, “इंग्रजी भाषा आवश्यक आहे, परंतु महाराष्ट्रात मराठी भाषा महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे मराठी शिकवणं आता अधिक महत्त्वाचं झालं आहे.”
शिक्षण विभागाकडे आलेल्या तक्रारींचा संदर्भ देताना भुसे यांनी म्हटलं की, अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. या तक्रारींवर तात्काळ कारवाईसाठी आता मराठी शिकवणे सक्तीचे करणारा कायदा लागू करण्यात आला आहे.
हा नियम खासगी, CBSE, ICSE किंवा इतर कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर बंधनकारक असेल. मराठी भाषा अनिवार्य केल्यामुळे राज्यातील शाळांमध्ये तिच्या अध्यापनाची व्याप्ती वाढणार आहे. यामुळे मराठीच्या संवर्धनाला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल आदराची भावना निर्माण होईल.
