आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाहन चोरीच्या मोडसवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

Spread the love

पुणे : सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीची पद्धत (मोडस ऑपरेंडी) ओळखून बिबवेवाडी पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याला जेरबंद केले. यश ज्ञानेश्वर खलसे (वय १९, रा. आगम मंदिराजवळ, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून यामाहा एफझेड, होंडा शाईन आणि अ‍ॅक्टीव्हा या तीन दुचाकींची, अंदाजे दीड लाख रुपये किमतीची चोरी उघड झाली

बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील दोन आणि कामशेत पोलीस ठाण्यातील एका प्रकरणासह, २०२४ मधील तीन वाहन चोरीचे गुन्हे आरोपीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे आणि गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांनी जुन्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेताना, वाहन चोरीच्या घटनांवर लक्ष केंद्रित केले.

पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अंमलदारांनी गुन्ह्याच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची मोडस ओळखली. यानंतर, पोलीस अंमलदार ज्योतिष काळे आणि प्रणय पाटील यांना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यश खलसेला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने तीन वाहनचोरीची कबुली दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, आणि सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे, गुन्हे निरीक्षक लोंढे, पोलीस उपनिरीक्षक येवले, आणि पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, अजय कामठे, सुमित ताकपेरे यांनी केली.