नववर्षाचे स्वागत आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करत एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेवक प्रवीण चोरबेले व मा. नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच थाटामाटात पार पडले.
ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे. यामध्ये महत्त्वाचे वेळापत्रक, विविध क्षेत्रांतील महत्त्वाचे संपर्क क्रमांक, तसेच भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. यामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, पणन व शिष्टाचार मंत्री मा. जयकुमार रावल, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री मा. दत्तात्रय भरणे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार हेमंत रासने आणि भीमराव तापकीर, तसेच जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा समावेश होता.
पर्वती मतदारसंघातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, व्यापारी वर्ग, आणि नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिनदर्शिकेचे कौतुक करत नव्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
२०२५ च्या दिनदर्शिकेमुळे नागरिकांना विविध सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, तसेच भारताचे यशस्वी नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व नरेंद्र मोदी यांची झलक प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणा देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 
			

















