वारजे माळवाडी पोलिसांची मोतीरामनगर येथे कारवाई; पाच सराईत गुन्हेगारांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. वारजे माळवाडी येथील मोतीरामनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाजवळ रविवारी सायंकाळी सुमारे पावणे आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून कोयता, तलवार तसेच मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतीक संजय हंकारे (वय १९), सूरज राणा गिरी (वय २३, रा. वडगाव शेरी), संस्कार युवराज एडके (वय १९), विशाल उत्तम वावळकर (वय २३) आणि ऋत्विक राजू जंगम (वय १९, तिघे रा. वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार निखिल तांगडे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात लूटमार व दागिने हिसकाविण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक सायंकाळी गस्त घालत असताना, वारजे परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाजवळ काही जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हंकारे, गिरी, एडके, वावळकर आणि जंगम यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून कोयता, तलवार आणि मिरची पूड असा एकूण २९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे करीत आहेत.


















