राजेंद्रनगरमधील घटनेत खुनाचा गुन्हा दाखल, एकाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारु पिऊन घरी आलेल्या तरुणाने घेतलेले पैसे न दिल्याने त्याला लाकडाने मारहाण करुन जखमी केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. विश्रामबाग पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
मन्या सोनवणे (रा. एसआरए बिल्डिंग, राजेंद्रनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आनंद परमेश्वर डोलारे (वय ३०, रा. राजेंद्रनगर) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई वनिता परमेश्वर डोलारे (वय ५७, रा. एसआरए बिल्डिंग, राजेंद्रनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना राजेंद्रनगरमधील एसआरए बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ५ जानेवारी रोजी घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आनंद डोलारे हा कामावरुन आल्यानंतर दारू पिऊन एसआरए बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आला होता. मन्या सोनवणे याने आनंद याला पैसे दिले होते.
ते आनंद याने परत केले नाहीत. या कारणावरुन मन्या सोनवणे याने आनंद याला लाकडाने मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला उचलून जमिनीवर जोरात आपटल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मन्या सोनावणे याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे तपास करीत आहेत.
