सिंहगड रोड पोलिसांची कारवाई; एकाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची अवैध विक्री सुरू असल्याचा प्रकार सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
विकास धोंडाप्पा आकळे (वय ३१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, मूळ रा. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीही आकळे याच्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.
सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक हद्दीत गस्तीवर असताना वडगाव बुद्रुक भागात गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर आढळले.
पोलिसांनी आरोपी विकास आकळे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गॅस सिलिंडर कुणाकडून आणले जात होते आणि कोणाला विक्री केली जात होती, याचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, कर्मचारी संजय शिंदे, आण्णा केकाण आणि उत्तम तारू यांच्या पथकाने केली.
