५०० रुपयांत १५ मिनिटांत बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तहसीलदारांच्या डिजिटल सहीचा बनावट उत्पन्नाचा दाखला फक्त ५०० रुपयांत अवघ्या १५ मिनिटांत तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. जुन्नर तालुका पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी विनोद चंद्रकांत बिडवई (रा. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तालुका पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी याबाबत फिर्याद दिली.
पुरवठा विभागातील कर्मचारी दीपाली कोकणे यांच्याकडे ताराबाई शिंदे शिधापत्रिका काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या कागदपत्रांची छाननी करताना ४५००० रुपये उत्पन्न दाखवलेला बनावट दाखला आढळला.
कोकणे यांनी कमी उत्पन्नाचा दाखला आणण्यास सांगितले असता शिंदे ४२००० रुपयांचा दुसरा दाखला घेऊन आल्या. त्यावर तहसीलदार रवींद्र सबनीस यांची डिजिटल सही असल्याचा संशय आल्याने कोकणे यांनी महसूल विभागाच्या ऑनलाइन वेबसाईटवर तपासणी केली.
परंतु, त्या दाखल्याची माहिती वेबसाईटवर उपलब्ध नव्हती. त्यांनी तत्काळ पुरवठा निरीक्षक कुलकर्णी यांना याची माहिती दिली. कुलकर्णी यांनी पुढील तपास करत दत्तात्रय शिंदे याला दाखला कोठून मिळवला, याची विचारणा केली.
शिंदे याने रामकृष्ण हरी लॉटरी सेंटर येथे दाखला तयार केल्याचे सांगितले. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पाचशे रुपये देऊन दाखला मिळविला. त्याला अवघ्या २० मिनिटांत बनावट दाखला मिळाला. या छाप्यात पोलिसांनी लॉटरी सेंटरमधून बनावट दाखले तयार करण्यासाठी लागणारे सीपीयू, मॉनिटर, कलर प्रिंटर आणि पाचशे रुपयांची नोट जप्त केली.
पोलिस निरीक्षक किरण अवचर व सहायक निरीक्षक एस. के. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. बनावट उत्पन्न दाखले तयार करणाऱ्या रॅकेटमुळे महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
