नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या नन्हे गावात ड्रेनेज कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यांवर ड्रेनेज काम सुरू असल्याने काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागात शैक्षणिक संस्था आणि खासगी कंपन्या असल्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने सतत वळवली जातात.
दरम्यान, ड्रेनेज कामामुळे काही रस्ते बंद करण्यात आल्याने दुचाकीस्वाराला मिळेल त्या रस्त्याने मार्ग शोधावा लागला. त्याचवेळी दुचाकीचा तोल गेला आणि ती ड्रेनेजमध्ये पडली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला आणि त्याच्या दुचाकीला ड्रेनेजमधून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नन्हे गावातील ड्रेनेज लाईनसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले होते.
परंतु निवडणुका आल्यामुळे आचारसंहितेमुळे काम थांबले होते. आता हे काम सुरू झाले असले तरी वाहतूक कोंडी आणि रस्ते बंद असल्याने नागरिकांना वर्दळीच्या ठिकाणी मार्ग शोधत बाहेर पडावे लागत आहे. याच दरम्यान हा अपघात घडला आहे.
