आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणेकरांसाठी धक्कादायक बातमी

Spread the love

पुणे : वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पुणे शहराला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. मात्र, ही ओळख कौतुकास्पद नसून चिंताजनक आहे. ‘टॉम टॉम’ या डच संस्थेच्या २०२४ च्या सर्वेक्षणानुसार, पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

या अहवालानुसार कोलंबियातील बरानकिला हे शहर वाहतूक कोंडीत प्रथम क्रमांकावर आहे. भारतातील कोलकाता दुसऱ्या, तर बेंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्याने चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

‘टॉम टॉम’ संस्थेच्या अहवालानुसार, पुण्यात १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे २२ सेकंद लागतात. कोलकातामध्ये याच अंतरासाठी ३४ मिनिटे ३३ सेकंद, बेंगळुरूमध्ये ३४ मिनिटे १० सेकंद, तर बरानकिलामध्ये सर्वाधिक ३६ मिनिटे ६ सेकंद लागतात.

पुण्यातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या ही वाहतूक कोंडीमागची मुख्य कारणे आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांचे रुंदीकरण सध्या मर्यादित आहे, त्यामुळे रस्त्यांवरील वाहनतळ अधिक वाढला आहे.

योग्य उपाययोजना आणि व्यवस्थापन न केल्यास वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. वाहनांची वाढती संख्या आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे भविष्यात पुणेकरांना अधिक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी समर्पित मार्गिका, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार, आणि रस्त्यांची नियोजनबद्ध सुधारणा यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे.