बार्शी ओपन टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटांतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : रोटरी क्लब बार्शी, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी, आणि अमर काळे असोसिएट्स यांच्या वतीने कर्मवीर डॉ. जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त बार्शी ओपन टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा 11 आणि 12 जानेवारी रोजी कर्मवीर क्रीडा संकुल, बार्शी येथे पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन श्री. नंदन जगदाळे (उपाध्यक्ष, श्री. शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी), प्रकाश पाटील (सचिव, श्री. शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी), आणि रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो. अनिल बंडेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या स्पर्धेचे आयोजन दुसऱ्या वर्षी यशस्वीरीत्या करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्पर्धेस अधिक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, छ. संभाजीनगर, बीड, यवतमाळ, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, परभणी, लातूर आणि बार्शी येथील 300 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण भागातील खेळाडूंना टेबल टेनिससारख्या क्रीडा प्रकाराची ओळख करून देणे आणि नामवंत खेळाडूंशी स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता. मुख्य विजेते राजवर्धन तिवारीने 11 वर्षाखालील व 19 वर्षाखालील दुहेरी गटात सुवर्णपदक पटकावले, तर इतर गटांत तीन कांस्यपदके जिंकली.
संकल्प बांदिवडेकरने 13 आणि 17 वर्षाखालील गटांत सुवर्णपदके मिळवली, तर इतर गटांत तीन कांस्यपदके पटकावली. मृदेय कळमकरने 15 आणि 19 वर्षाखालील गटांत सुवर्णपदके तर इतर गटांत दोन कांस्यपदके जिंकली. श्रावणी मेनने 11 व 13 वर्षाखालील गटांत सुवर्णपदके, तर इतर गटात एक कांस्यपदक पटकावले.
मृदुला सुरवसेने 15 वर्षाखालील गटात सुवर्ण आणि इतर गटांत दोन रौप्यपदके मिळवली. वेदांकिता पाटीलने 17 व 19 वर्षाखालील गटांत सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले. राजवर्धन तिवारी, संकल्प बांदिवडेकर, आणि मृदेय कळमकर हे ‘बेस्ट प्लेयर’ ठरले. त्यांनी स्पर्धेत प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
पुरुष गटातील विजेतेपद पुरुष एकेरीत आमिष आठवलेने सुवर्ण तर पवन कदमने रौप्यपदक जिंकले. पुरुष दुहेरीत रोहित जोशी आणि आमिष आठवले यांनी सुवर्णपदक मिळवले, तर पवन कदम व पियुष रामावत यांनी रौप्यपदक पटकावले. प्रौढ एकेरीत रोहिदास गरुड यांनी सुवर्णपदक, तर मनीष पिंगे यांनी रौप्यपदक जिंकले.
प्रौढ दुहेरीत रोहिदास गरुड आणि राजीव कुलरवार यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे व्यवस्थापन गणेश स्वामी व प्रा. एस. एम. लांडगे यांनी केले. पंच म्हणून गणेश स्वामी, कृष्णा थोरात, अजय बोरवणकर, गौरव कमठाणे आणि गणेश भराटे यांनी काम पाहिले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. अतुल कल्याणी आणि कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य प्रा. एस. एस. गोरे यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी रोटरी सदस्य गिरीश झंवर, अनिल बंडेवार, विशाल देशमुख, प्रदीप बागमार, आनंद बेदमुथा, अमित खटोड यांनी आर्थिक सहकार्य केले.
