आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीएमपीत १८ हजार ‘फुकटे’ पकडले

Spread the love

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. मागील वर्षभरात तब्बल १८ हजार प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून १ कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

महामंडळाने १ जानेवारी ते २३ डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ हजार १०४ विनातिकीट प्रवाशांना पकडले. या कारवाईतून एकूण १ कोटी ३३ लाख २८ हजार ६०० रुपयांची दंडवसुली झाली आहे. पीएमपीच्या वारंवारच्या प्रयत्नांनंतरही विनातिकीट प्रवासाचे प्रमाण घटण्याऐवजी वाढत आहे.

पीएमपीने दंडाची मर्यादा ५० रुपये ते ५०० रुपये अशी ठेवली आहे. विशेष म्हणजे तिकीट घेतले तरी तपासणीच्या वेळी ते हरवले असल्यास प्रवाशाला ५०० रुपयांचा दंड भरावा लागतो. पीएमपी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असूनही काही प्रवासी नियमांचे पालन करत नाहीत. महामंडळाकडून किफायतशीर दरात सेवा दिली जाते, तरीही नियमभंगाचा प्रकार थांबत नाही. अधिकाऱ्यांनी सातत्याने कारवाई करून दंड वसूल केला तरी हा प्रश्न कायम आहे.

महामंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी ४५ ते ५० जण विनातिकीट प्रवास करतात, तर दिवसाला सरासरी २५ हजार ३५५ रुपयांची दंडवसुली केली जाते. प्रवाशांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असून, दंड टाळण्यासाठी प्रवासाला नेहमी वैध तिकीट बाळगावे.