आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी

Spread the love

पुणे : आर्मी ऑफिसर असल्याचा बनाव करून सायबर चोरट्याने कोथरूड येथील एका ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख ३५ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे कोथरूडमधील गुरूराज हाऊसिंग सोसायटीत राहतात. डिसेंबर महिन्यात चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधून आपण आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले. कोथरूड भागात भाडेतत्त्वावर सदनिका घ्यायची असून डिपॉझिटसाठी रक्कम पाठवायची आहे, अशी बतावणी केली.

चोरट्याने डिपॉझिटसाठी बँक खात्याची माहिती मागून घेतली आणि तिचा गैरवापर करून तक्रारदाराच्या खात्यातून ५ लाख ३५ हजार २०० रुपये काढले. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

फसवणुकीच्या या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अशा बनावट कॉल्सपासून सतर्क राहावे आणि बँक खात्याची माहिती कोणालाही शेअर करू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.