आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पेट्रोल पंपावरील कॅश लुटण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : पेट्रोल पंपावरील साडेतीन लाख रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना तिघा चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मॅनेजरला मारहाण करून पैशांची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली, तरीही मॅनेजरने पैशांची बॅग काही सोडली नाही. चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.

याबाबत सलीम सिकंदर शेख (वय ३१, रा. खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील माऊलीनगरमधील जनता सहकारी बँकेसमोर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रोडवरील ए. एम. के. इंटरप्रायजेस या पेट्रोल पंपावर सलीम शेख गेल्या १० वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम करत आहेत. पेट्रोल पंपावरील कॅश ते नेहमी पायी चालत जनता बँकेत भरणा करतात.

सोमवारी, दोन दिवसांची ३ लाख ४६ हजार रुपयांची कॅश भरण्यासाठी जात असताना त्यांनी पेट्रोल पंपावरून रोड ओलांडून समोरील फुटपाथवर पाऊल ठेवले. तेवढ्यात एकाने त्यांना माऊलीनगरचा पत्ता विचारला.

त्यांनी “हेच माऊलीनगर आहे; तुम्हाला कोठे जायचे?” असे विचारताच दोन चोरटे मागून आले आणि त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करूनही शेख यांनी बॅग सोडली नाही.

त्यांचा आरडाओरडा ऐकून नागरिक जमा होत असल्याचे पाहून चोरटे पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्या आधारे भारती विद्यापीठ पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.